पंजाबमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होईल; अमित शाहांचा दावा, ‘आप’वरही निशाणा

    22-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : पंजाबमधील २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंजाबमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवरही टीका केली.

दिल्ली येथे यमुना नदीच्या स्वच्छतेसाठीच्या ८ हजार ९४१ कोटी रुपयांच्या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी शाह बोलत होते. पंजाबमध्ये आंदोलन करून काही साध्य होणार नाही, असे सांगत त्यांनी राज्यातील जनतेला आता एनडीएचे सरकार हवे असल्याचा दावा केला.

‘आप’च्या सरकारवर अमित शाहांची टीका-
पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागेल, असा दावा अमित शाह यांनी केला. केवळ कारणे देऊन पक्षाला आपले राजकीय अस्तित्व टिकवता येणार नाही, असेही ते म्हणाले. पंजाबमध्ये एनडीएचे सरकार स्थापन झाल्यास अमली पदार्थांची तस्करी संपवण्यासाठी पावले उचलली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

ईव्हीएम आणि मतचोरीच्या आरोपांवरून विरोधकांना लक्ष्य-
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधक ईव्हीएममध्ये गडबड आणि मतचोरीचे आरोप करतात, अशी टीका शाह यांनी केली. अनेक राज्यांमध्ये दीर्घकाळ सत्तेबाहेर राहिल्यानंतरही विरोधकांकडून निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे ते म्हणाले.

पंजाबमध्ये २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षासमोर विरोधकांचे आव्हान असेल. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या विधानामुळे पंजाबमधील आगामी निवडणुकीसाठी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग येण्याची शक्यता आहे.