नागपूर पदवीधर निवडणुकीत बंडखोरीचे पडसाद; नितेश कराळे गुरुजींची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

    22-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पदवीधर मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या विरोधात नितेश कराळे गुरुजी यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. कराळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील पाच विधान परिषद मतदारसंघांसाठी निवडणूक होत असून, त्यामध्ये नागपूर, पुणे आणि मराठवाडा पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीसमोर काही मतदारसंघांत बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अभिजीत वंजारी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, नितेश कराळे गुरुजी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवल्याने आघाडीतील राजकीय समीकरणांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्याविरोधात कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मराठवाडा पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातही महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

राज्यातील पाचही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचारासाठी जोर लावण्यात आला आहे. आता या निवडणुकीत मतदार कोणाला पसंती देतात आणि बंडखोरीचा निकालावर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.