
Image Source:(Internet)
अमरावती : अमरावतीच्या राजकारणात एकेकाळी परस्परांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू एकत्र आल्याची चर्चा रंगली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या कथित भेटीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमरावतीतील एका महाविद्यालयात रवी राणा आणि बच्चू कडू यांची बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या विजयासाठी निवडणुकीची रणनीती आखण्याच्या उद्देशाने ही बैठक झाल्याची चर्चा आहे. मात्र, या बैठकीबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याचा विकास आणि जनतेचे प्रश्न यांना प्राधान्य देण्याची भूमिका या घडामोडींमधून पुढे येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राणा आणि कडू यांच्यातील राजकीय संबंधांमध्ये काही बदल होत आहेत का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत किरण सरनाईक यांच्यासाठी संभाव्य एकजूट किती फायदेशीर ठरणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल. तूर्तास, अमरावतीतील या कथित भेटीमुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.