
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियातील दम्माम विमानतळावर बुधवारी संध्याकाळी झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एकूण दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सौदी अरेबियाच्या जनरल अॅथॉरिटी ऑफ सिव्हिल एव्हिएशनने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सौदी अरेबियाच्या एका आणि भारताच्या एका नागरिकाचा समावेश आहे. यासंदर्भात सौदीच्या अधिकाऱ्यांनी भारतीय दूतावासाला माहिती दिली आहे.
भारतीय अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृताच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. मृत भारतीय नागरिकाची ओळख पटवणे आणि जखमींच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. पीडित कुटुंबीयांशीही संपर्क साधला जात आहे.
दरम्यान, या हल्ल्यामागील नेमके कारण, हल्लेखोरांची ओळख आणि विमानतळावरील नुकसानीबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. या घटनेचा तपास आणि अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.