
Image Source:(Internet)
नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आता शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीत एकूण १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. राज्यातील पाच मतदारसंघांत मिळून १० लाख ६८ हजार ७२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या निवडणुकीत पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघांसह अमरावती व पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. उमेदवारांची संख्या पाहता पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक चुरस आहे.
छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघात ४१, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात ४७ आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात २६ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
नागपूर विभागात ४५५ मतदान केंद्रे-
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. मतदान साहित्याचे वितरण चोख पोलीस बंदोबस्तात करण्यात येणार असून, मतदान पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत एकूण ४५५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यापैकी सर्वाधिक २४६ केंद्रे नागपूर जिल्ह्यात आहेत.
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी २ हजार ५३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय केंद्र सरकारचे ४७६ अधिकारी तसेच गडचिरोली जिल्ह्यासाठी केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांतील ३२ अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नागपुरात २७ ऑक्टोबरला मतमोजणी-
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण २ लाख ५५ हजार ४०५ मतदारांची नोंदणी आहे. यामध्ये १ लाख ४७ हजार २८० पुरुष आणि १ लाख ८ हजार ३०१ महिला मतदारांचा समावेश आहे.
जिल्हानिहाय मतदारसंख्या पाहता नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ४४ हजार ४६६ मतदार आहेत. चंद्रपूरमध्ये ३२ हजार २६२, गोंदियात २२ हजार १७६, वर्ध्यात २१ हजार ७४२, भंडाऱ्यात २१ हजार ३४९, तर गडचिरोलीमध्ये १३ हजार १०६ मतदार आहेत.
मतदानासाठी नागपूर जिल्ह्यात २४६, चंद्रपूरमध्ये ५८, वर्ध्यात ४१, गोंदियात ३९, भंडाऱ्यात ३५ आणि गडचिरोलीमध्ये २६ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या निवडणुकीची मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार असून, त्यानंतर पाचही मतदारसंघांतील निकाल स्पष्ट होणार आहेत.