नागपुरात अल्पवयीन मित्राकडून विद्यार्थिनीवर अत्याचाराचा आरोप; गर्भवती असल्याचे तपासणीत उघड!

    22-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलाकडून विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय तपासणीत विद्यार्थिनी आठ आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय मुलाविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी आणि आरोपी एकाच शाळेत शिकत होते. ओळखीचा फायदा घेत आरोपीने २३ फेब्रुवारी ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तिला वारंवार घरी बोलावले. यावेळी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीने सुरुवातीला ही बाब कोणालाही सांगितली नव्हती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनीची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे तिची आई तिला तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात घेऊन गेली. वैद्यकीय तपासणीनंतर ती आठ आठवड्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला.

घरी परतल्यानंतर कुटुंबीयांनी विचारपूस केली असता विद्यार्थिनीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.