Image Source:(Internet)
लखनऊ : उत्तर प्रदेशात भाजपला (BJP) धक्का बसला आहे. बदायूं जिल्ह्यातील बिसौली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजप नेते कुशाग्र सागर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली. तब्बल ११ वर्षे पक्षात काम करूनही अपेक्षित सन्मान मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
कुशाग्र सागर यांनी आपल्या संदेशात पक्षासाठी केलेल्या कामाचा उल्लेख केला. वैयक्तिक आयुष्यात अडचणी असतानाही आपण पूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले आणि संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपला आपण आपले कुटुंब मानले होते. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या कठीण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मात्र, पक्षात दीर्घकाळ काम करूनही अपेक्षेप्रमाणे सन्मान न मिळाल्याने मनाला वेदना झाल्याचे सागर यांनी स्पष्ट केले. यासोबतच पक्षातील सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान, कुशाग्र सागर समाजवादी पक्षात (सपा) प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यांच्या राजीनाम्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.