Image Source:(Internet)
नागपूर : लखनऊ (Lucknow) येथील शिवा शर्मा हत्या प्रकरणात नागपुरातून अटक करण्यात आलेल्या श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि चालक दानिश अली यांना न्यायालयाच्या परवानगीनंतर लखनऊला रवाना करण्यात आले आहे. नागपूर सत्र न्यायालयाने तिघांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यानंतर लखनऊ पोलिसांचे पथक त्यांना पुढील तपासासाठी घेऊन गेले.
लखनऊच्या हजरतगंज परिसरात ९ ऑक्टोबर रोजी शिवा शर्मा यांची हत्या झाली होती. या घटनेचा तपास सुरू असताना संबंधित तिघांचा शोध घेतला जात होता. ते नागपुरातील चिचभवन परिसरात असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली. त्यानुसार नागपूर गुन्हे शाखा, लखनऊ पोलीस आणि उत्तर प्रदेश एसटीएफ यांनी संयुक्त कारवाई करत एका फ्लॅटमधून तिघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर बेलतरोडी पोलीस ठाण्यात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर तिघांना हुडकेश्वर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. दरम्यान, लखनऊहून आलेल्या पोलीस पथकात महिला कर्मचारी नसल्याने महिला आरोपींना घेऊन जाण्यासाठी लखनऊ येथून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना नागपुरात बोलावण्यात आले.
बुधवारी तिन्ही आरोपींना नागपूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यानंतर लखनऊ पोलिसांचे पथक त्यांना घेऊन रवाना झाले. आता लखनऊमध्ये शिवा शर्मा हत्याकांडाचा पुढील तपास केला जाणार असून, या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया तेथील पोलिसांकडून पूर्ण केली जाईल.