‘ना ५०० कोटी दिले, ना घेतले’; मनोज जरांगेंच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

    21-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांना शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मी कोणाला ५०० कोटी रुपये दिलेही नाहीत आणि कोणाकडून घेतलेही नाहीत,” असे स्पष्ट करत जरांगे यांनी आरोप करण्यापूर्वी त्याची खातरजमा करायला हवी होती, असे शिंदे म्हणाले. तसेच, जरांगेंकडे या आरोपांसंदर्भात काही पुरावे असतील, तर त्यांनी ते संबंधित यंत्रणांकडे सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

नारायण गडावरील दसरा मेळाव्यातून आरोप-
मंगळवारी नारायण गड येथे झालेल्या दसरा मेळाव्यात भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला ५०० कोटी रुपये दिल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू असल्याचा दावा त्यांनी केला होता.

याबाबत एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांना काही सांगितले आहे का, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला. तसेच, या आरोपांवर शिंदे यांनी दसरा मेळाव्यातच उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले होते. या विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

पुरावे असतील तर संबंधित यंत्रणांकडे द्या-
जरांगेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, कोणालाही ५०० कोटी रुपये दिलेले नाहीत किंवा कोणाकडून घेतलेलेही नाहीत. आरोप करण्यापूर्वी त्याची शहानिशा करणे आवश्यक होते. जरांगेंकडे काही पुरावे असतील, तर त्यांनी ते संबंधित यंत्रणांकडे द्यावेत आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.एकनाथ शिंदेंना सगळा महाराष्ट्र ओळखतो. माझ्या कामाची पद्धत लोकांना माहिती आहे,असे सांगत अनेक जण प्रसिद्धीसाठी आपले नाव घेत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मराठा समाजासाठी मी काम केले-
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी काम करत आहेत आणि त्यांनी समाजाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असे शिंदे म्हणाले. आपण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले, असेही त्यांनी नमूद केले.

जरांगे उद्या पुरावे सादर करणार?
दरम्यान, मनोज जरांगे पाटील उद्या पत्रकार परिषद घेणार असून, त्यामध्ये पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत ते नेमके कोणते पुरावे मांडणार आणि ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराबाबत आणखी काय खुलासे करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या आरोपांवरून सुरू झालेल्या वादात आता जरांगे पाटील यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असून, त्यांच्या दाव्यांची सत्यता संबंधित पुरावे आणि चौकशीतूनच स्पष्ट होऊ शकेल.