भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्राचे तीन चेहरे; नितीन नबीन यांची ३४ सदस्यीय कार्यकारिणी जाहीर

    21-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील तीन पदाधिकाऱ्यांना या टीममध्ये स्थान मिळाले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या ३४ सदस्यीय कार्यकारिणीत सायली रघुनाथ कुलकर्णी, वीरेंद्र पाटील आणि गुरदित सिंग वोहरा यांचा समावेश आहे. या नियुक्त्यांमुळे महाराष्ट्रातील युवा नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

या कार्यकारिणीत बिहारमधील अलीनगरच्या आमदार आणि गायिका मैथिली ठाकूर यांचीही राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आमदारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर सोपविण्यात आलेली ही महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी मानली जात आहे.

नियुक्तीनंतर मैथिली ठाकूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमांग जोशी यांचे आभार मानले. पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने, शिस्तीने आणि समर्पणाच्या भावनेतून पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नव्या कार्यकारिणीमध्ये उत्तर प्रदेशला सर्वाधिक पाच जागा देण्यात आल्या आहेत. बिहार, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. उर्वरित १७ सदस्यांची निवड विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून करण्यात आली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवणे, केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणे, संघटनात्मक कार्यक्रम राबवणे आणि युवकांना पक्षाशी जोडणे अशी महत्त्वाची कामे केली जातात. नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील तिघांचा समावेश झाल्याने राज्यातील युवा नेतृत्वाला पक्षाच्या राष्ट्रीय संघटनात्मक कामात योगदान देण्याची संधी मिळणार आहे.