टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आरोपींना ३१ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

    21-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबार प्रकरणात किल्ला न्यायालयाने आरोपींना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी न्यायालयाकडे १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. गोळीबारात वापरलेले शस्त्र, आरोपींनी नष्ट केलेले मोबाईल आणि या गुन्ह्यामागील संभाव्य कटाचा शोध घेण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले.

गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत राजस्थानमधील कोटा येथून त्यांना अटक केली. त्यानंतर ट्रान्झिट रिमांडच्या आधारे आरोपींना मुंबईत आणण्यात आले. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सुनावणीदरम्यान आरोपींनी सुरुवातीला वकीलपत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. संबंधित कागदपत्र कशासाठी आहे आणि त्यावर सही का करायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वकिलांनी समजावून सांगितल्यानंतर त्यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर न्यायालयात पोलीस कोठडीच्या मागणीवर युक्तिवाद झाला.

मुंबई पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल नष्ट केले आहेत. हे मोबाईल शोधून काढण्याबरोबरच गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र कुठे ठेवले आहे, याचाही तपास करायचा आहे. आरोपींना शस्त्र कोणी पुरवले, त्यांच्याकडे आणखी काही शस्त्रे आहेत का आणि या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे, हे शोधणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने परराज्यांत जाऊन तपास करावा लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक अनिल पंडित याच्या नावाने धमकी आल्याचा दावा करण्यात आला आहे. गोळीबारानंतर एक ऑडिओ क्लिप समोर आल्याने तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्लिपचा नेमका संबंध काय आणि या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा उलगडा करण्यासाठी आरोपींची चौकशी करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

दुसरीकडे, आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. आपल्या पक्षकारांचा गुन्ह्याशी कोणताही संबंध नसून, ते निर्दोष असल्याचा दावा त्यांनी केला. आरोपींची यापूर्वीच चौकशी झाली आहे आणि त्यांना ४८ तासांची पोलीस कोठडीही देण्यात आली होती, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. केवळ संशयाच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगत त्यांना पुढील पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची मागणी करण्यात आली.

सरकारी पक्षाने मात्र सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि दुचाकीचा माग काढल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता असून, प्रत्येकाची भूमिका निश्चित करण्यासाठी तपास आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

न्यायालयाने आरोपींना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिल्यानंतर आता पोलिसांकडून या प्रकरणातील महत्त्वाचे दुवे जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नष्ट केलेले मोबाईल, अद्याप न सापडलेले शस्त्र आणि धमकीच्या ऑडिओ क्लिपमागील सत्य समोर येते का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबई पोलीस या प्रकरणाबाबत सायंकाळी ५.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले.