नागपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासासाठी ९९१ कोटींचा आराखडा; शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा

    21-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी ९९१ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे. चार टप्प्यांत पूर्ण होणाऱ्या या विकासकामांना राज्य सरकारने लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमातून करण्यात आली. यासोबतच भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार आणि आजच्या जागतिक परिस्थितीत बौद्ध धम्माचे महत्त्व यावरही मान्यवरांनी प्रकाश टाकला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने मंगळवारी दीक्षाभूमी येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अधिवक्ता शैलेश नारनवरे यांनी दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेची माहिती दिली. दीक्षाभूमीच्या विकासासाठी ९९१ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याची चार टप्प्यांत अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जागतिक शांततेसाठी बुद्धविचारांची गरज-
समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला म्यानमारचे भदंत वन्ना सिरी महाथेरो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फ्रान्समधील प्राकुंट बुद्धिस्ट अकादमीचे अध्यक्ष डॉ. टी. धम्म रतन यांनी आपल्या भाषणात जागतिक पातळीवरील समस्यांचा उल्लेख करत बुद्धांच्या शिकवणीचे महत्त्व स्पष्ट केले.

जगासमोर आर्थिक संकटे आणि विविध आंतरराष्ट्रीय आव्हाने उभी असताना शांतता, सहअस्तित्व आणि मानवी न्याय प्रस्थापित करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांचे विचार मार्गदर्शक ठरू शकतात, असे त्यांनी सांगितले. बौद्ध धम्माचा प्रभाव आशियाबाहेरील देशांमध्येही वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाबोधी विहार आणि स्वतंत्र कायद्याची मागणी-

दिल्लीचे भंते करुणाकरण यांनी महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी केली. तसेच बौद्ध समाजासाठी स्वतंत्र व्यक्तिगत कायदा असावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

बुद्ध आणि आंबेडकरांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन-
कर्नाटकचे जेसे ठाकपा जिंगपा यांनी भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे केवळ स्मरण न करता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांनुसार जीवन जगणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. बौद्ध धम्म हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

या सोहळ्यात देश-विदेशातून आलेल्या बौद्ध भिक्खू आणि अनुयायांनी भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. बेंगळुरूचे जिग्मे सुल्ट्रीम महाथेरो, सारनाथचे डी. रेवतथेरो, अधिवक्ता आनंद फुलझेले आणि स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

दीक्षाभूमीच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यास या ऐतिहासिक स्थळाच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.