दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदी सुन्न; आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूने पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश

    02-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

आळंदी : कोकणातील दिवेआगर समुद्रकिनारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’च्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती आळंदीत पोहोचताच संपूर्ण शहरावर शोककळा पसरली असून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

आळंदीतील विनर्स अकॅडमीच्या इयत्ता ११वी आणि १२वी सायन्सच्या सुमारे ४२ विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक गुरुवारी पहाटे रायगड आणि दिवेआगर सहलीसाठी रवाना झाले होते. दिवेआगर समुद्रकिनारी विद्यार्थी पाण्यात उतरले असताना एका विद्यार्थ्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर विद्यार्थीही खोल पाण्यात ओढले गेले. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य केले; मात्र आठ विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यात यश आले नाही.

या दुर्घटनेत यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वहिले, कौस्तुभ संदीप दौड, कैवल्य वासनकर, राजवीर वहिले, प्रणव बनसोडे आणि सुमित अहिरे यांचा मृत्यू झाला. सर्व विद्यार्थी आळंदी आणि केळगाव परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच मृत विद्यार्थ्यांच्या घराबाहेर आणि अकॅडमी परिसरात नागरिकांची गर्दी झाली. सकाळी हसतमुखाने घराबाहेर पडलेली मुले आता पार्थिव रूपात परतणार असल्याने पालकांनी फोडलेला टाहो पाहून परिसरातील प्रत्येकाचे डोळे पाणावले. अनेक घरांमध्ये चुलीही पेटल्या नाहीत.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर सहलीच्या नियोजनावर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यार्थ्यांकडून संमतीपत्र घेण्यात आले होते, मात्र समुद्रकिनारी सुरक्षा व्यवस्था आणि विद्यार्थ्यांवर देखरेख योग्य प्रकारे करण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

रायगड आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह आळंदीत आणण्याची तयारी सुरू आहे. दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शोकाकुल नागरिकांकडून होत आहे.