
Image Source:(Internet)
समृद्धी महामार्गावर धामणगावजवळ दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या पिकअपला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याची भीषण घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा सातवर पोहोचला आहे. या दुर्घटनेत २१ जण जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील भाविक शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन बोलेरो पिकअप क्रमांक MH-05-BH-5793 मधून वर्ध्याकडे निघाले होते. पिकअपच्या मागे ट्रॉली जोडण्यात आली होती. धामणगावजवळील समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक ९७ परिसरात पिकअप संथगतीने जात असताना मागून आलेल्या १६ चाकी ट्रक क्रमांक CG-07-CZ-8855 ने जोरदार धडक दिली. धडकेनंतर पिकअपमधील प्रवाशांवर गंभीर संकट कोसळले.
या अपघातात दत्ता कुरसंगे (५५), प्रवीण बकाने (५०), घनश्याम पाटील (६०), गोलू उर्फ सचिन बादलमवार (३८) आणि ओम गावंडे (२२) यांचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला.
अपघातातील जखमींना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सावंगी मेघे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
नगराध्यक्षांसह पोलिसांची घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच धामणगावच्या नगराध्यक्ष अर्चना अडसड-रोठे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जखमींसाठी वाहनांची व्यवस्था करण्यास मदत केली. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, पोलीस अधीक्षक अनिकेत कदम, चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश ताथोड यांनी घटनास्थळी भेट दिली. दत्तापूरचे पोलीस निरीक्षक गजानन मेहत्रे तसेच मंगरूळ दस्तगीरचे पोलीस निरीक्षक आत्राम यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.