किल्ले कोलार हत्याकांडाचा सहा महिन्यांनी उलगडा; चप्पलच्या धाग्यावरून आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस

    19-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : किल्ले कोलार परिसरात सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या हत्या प्रकरणाचा तपास करताना खापरखेडा पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. घटनास्थळी सापडलेल्या चप्पलच्या आधारे पोलिसांनी बाबू उर्फ अन्वर अल्ताफ शेख याचा शोध घेत त्याला अटक केली. या प्रकरणातील दुसरा संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

३० मार्च २०२६ रोजी किल्ले कोलार परिसरात प्रशांत कुंभारे मृतावस्थेत आढळला होता. त्याच ठिकाणी फिरोज गुलमीर शेख गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला होता. या घटनेनंतर खापरखेडा पोलिसांनी तपास सुरू केला; मात्र संशयितांचा ठावठिकाणा लागत नसल्याने तपासात अडथळे येत होते.

तपासादरम्यान मृत प्रशांत आणि जखमी फिरोज हे ताजबाग परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. प्रशांतचा बाबू उर्फ अन्वर आणि त्याच्या एका साथीदारासोबत वाद झाल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. या वादातूनच हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

चप्पल ठरली तपासातील महत्त्वाची कडी-
घटनास्थळी मिळालेल्या चप्पलीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. खापरखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप बुवा यांनी तपासाला गती दिली. तपास अधिकारी शोएब खान यांनी गोपनीय माहितीदारांच्या मदतीने ताजबाग परिसरात चौकशी केली. परिसरातील नागरिकांकडून माहिती गोळा करताना संबंधित चप्पल बाबू उर्फ अन्वरशी जोडली गेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात येते.

यानंतर पोलिसांनी संशयिताच्या हालचालींवर लक्ष ठेवले. तो ताजबाग परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. घटनेनंतर आरोपी गोंदिया, पुणे आणि त्यानंतर नागपूर येथे राहिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणातील दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण आणि घटनेशी संबंधित अन्य बाबींचा तपास खापरखेडा पोलीस करत आहेत.