
Image Source:(Internet)
बीड : बीडमधील शिक्षक सय्यद साजेद अली यांच्या हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. गँगस्टर गुजर खानचे पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचा आरोप करत मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांनी आणि साक्षीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी आणि कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.
२०१३ मध्ये गुजर खान आणि त्याच्या टोळीने शिक्षक सय्यद साजेद अली यांचे दोन्ही पाय तोडल्याचा आरोप आहे. त्यानंतर १९ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. या प्रकरणात गुजर खानसह १४ जणांना कारावासाची शिक्षा झाली होती.
दरम्यान, प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून, पॅरोलवर बाहेर आलेला आरोपी सय्यद शाहरुख साक्षीदार आणि पीडित कुटुंबीयांना धमकावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित आरोपीकडून मारहाण झाल्याचाही दावा कुटुंबीयांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.
मृत शिक्षकाचे भाऊ सय्यद जावेद यांनी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. गुजर खानच्या पाकिस्तान कनेक्शनच्या आरोपांची चौकशी करून सत्य समोर आणावं, अशीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागलं आहे.