दुर्गामूर्ती विसर्जनाचे फोटो-व्हिडिओ काढण्यास मुंबई पोलिसांची बंदी ; २० ते २२ ऑक्टोबरदरम्यान निर्बंध

    17-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : दुर्गामूर्ती विसर्जनाच्या काळात धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी मुंबई पोलिसांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. २० ते २२ ऑक्टोबरदरम्यान विसर्जन सुरू असताना पाण्यावर तरंगणाऱ्या किंवा अर्धवट पाण्यात बुडालेल्या दुर्गामूर्तींचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास तसेच ते प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे.

भारतीय नागरी सुरक्षा संहितेअंतर्गत आदेश-
मुंबई पोलिसांच्या एका पोलीस उपायुक्तांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत हे निर्बंध लागू केले आहेत. विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सार्वजनिक शांतता अबाधित राहावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

समुद्राच्या लाटांमुळे मूर्ती पुन्हा किनाऱ्यावर येण्याची शक्यता-
मुंबईत दुर्गामूर्तींचे विसर्जन समुद्रात आणि अन्य विसर्जनस्थळी केले जाते. मात्र, काही वेळा मूर्ती पूर्णपणे पाण्यात न बुडाल्याने त्या अंशतः पाण्यात बुडलेल्या अवस्थेत राहतात. समुद्राच्या लाटांमुळे अशा मूर्ती पुन्हा किनाऱ्यावर येऊ शकतात किंवा पाण्यावर तरंगताना दिसतात.अशा परिस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी मूर्ती पुन्हा विसर्जित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करतात.

धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता-
विसर्जनानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या किंवा अर्धवट बुडालेल्या मूर्तींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यास धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. तसेच, अशा दृश्यांमुळे गैरसमज निर्माण होऊन सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून चित्रीकरण आणि अशा दृश्यांच्या प्रसारणावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन-
दुर्गामूर्ती विसर्जनाच्या काळात नागरिकांनी पोलिसांच्या आदेशाचे पालन करावे आणि धार्मिक भावना दुखावतील असे फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करणे टाळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.