लालकृष्ण अडवाणी छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

    17-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीचा संसर्ग आणि वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांमुळे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून देखरेख-
वयाच्या ९८व्या वर्षी असलेल्या अडवाणी यांना शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालयातील डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांच्या उपचारांबाबत तसेच प्रकृतीतील पुढील बदलांबाबत रुग्णालयाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

८ नोव्हेंबरला साजरा करणार ९९ वा वाढदिवस-
लालकृष्ण अडवाणी हे भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असून, भाजपच्या वाटचालीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी देशाचे उपपंतप्रधान म्हणूनही काम पाहिले आहे. येत्या ८ नोव्हेंबर रोजी ते ९९व्या वर्षात पदार्पण करणार आहेत.

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित-
देशाच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाबद्दल अडवाणी यांना २०२४ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रकृतीच्या वृत्तानंतर त्यांचे समर्थक आणि हितचिंतक त्यांच्या लवकर प्रकृतीसुधारणेसाठी प्रार्थना करत आहेत.अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच त्यांच्या आरोग्याविषयीची पुढील स्थिती स्पष्ट होईल.