मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; मृत्यूच्या कारणाचा शोध सुरू

    17-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील नगला पदम गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या तीन लहान मुलांचा समावेश आहे. रात्री इन्स्टंट नूडल्स खाल्ल्यानंतर हे कुटुंब झोपले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी पाचही जण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पती-पत्नींसह तीन चिमुकल्यांचा मृत्यू-
या घटनेत महेश (वय ३७), त्यांची पत्नी ललिता (वय ३५) आणि त्यांची तीन मुले लड्डू (वय ११), मिष्टी (वय ७) व साक्षात (वय ३) यांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

रात्री नूडल्स खाल्ले; सकाळी आढळले मृतदेह-
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सदस्यांनी मॅगी खाल्ली होती. त्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी गेले. शनिवारी सकाळी बराच वेळ होऊनही घरातील कोणीच उठले नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, पाचही जण आपापल्या अंथरुणात मृतावस्थेत आढळले.घटनेची माहिती मिळताच राबुपुरा पोलीस ठाण्याचे पथक, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रुग्णवाहिका आणि अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची तपासणी करून आवश्यक पुरावे गोळा केले.

शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार-
पोलिसांनी पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, अन्नाचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. नूडल्स खाल्ल्यामुळेच मृत्यू झाला, असा निष्कर्ष अद्याप निघालेला नाही. शवविच्छेदन अहवाल आणि प्रयोगशाळेतील तपासणीचे निष्कर्ष समोर आल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

अन्नातील भेसळीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर-
या घटनेमुळे अन्नाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी राबुपुरा परिसरात फ्रिजमध्ये ठेवलेली पपई खाल्ल्यानंतर तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचा उल्लेखही करण्यात येत आहे. दरम्यान, दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तपासण्यात आलेल्या ४८३ अन्न नमुन्यांपैकी २४७ नमुने निर्धारित मानकांनुसार अयोग्य आढळले. विशेषतः पनीरच्या १०४ नमुन्यांपैकी ९० नमुने निकषांवर अपुरे ठरले. दूध, खवा, मसाले आणि रिफाइंड तेलामध्येही भेसळीची प्रकरणे समोर आल्याचे सांगण्यात आले आहे.या घटनेचा तपास सुरू असून, अन्न सुरक्षा विभागाच्या अहवालाकडे आणि शवविच्छेदनाच्या निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.