गोधनीतील गॅसगळतीप्रकरणी पोलिसांची कारवाई; ठेकेदारासह टँकर पुरवठादारावर गुन्हा!

    16-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : गोधनी येथील जलशुद्धीकरण केंद्रात झालेल्या क्लोरीन वायूगळतीप्रकरणी मानकापूर पोलिसांनी ठेकेदार आणि क्लोरीन टँकर पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २४ ऑगस्टच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विषारी वायूच्या संपर्कात आल्याने अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला होता. या घटनेची प्रशासकीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे.

गोधनी जलशुद्धीकरण केंद्रात कार्यरत यांत्रिकी उपअभियंता श्रीकांत बत्तुलवार यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. ठेकेदार मोहन आनंद आणि पार्श्व असोसिएट्स या क्लोरीन टँकर पुरवठादार फर्मचे मालक राजकुमार ताटेड यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

चौकशी समितीच्या अहवालानुसार, जलशुद्धीकरण केंद्रात ठेवलेल्या स्टँडबाय क्लोरीन टँकरमधून अचानक मोठ्या प्रमाणात वायूगळती झाली. क्लोरीन वायूच्या धोकादायक स्वरूपाची माहिती असूनही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप आहे. तसेच गळती सुरू झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यास विलंब झाल्याने परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

नागरिकांना श्वसनाचा त्रास; काहींवर आयसीयूमध्ये उपचार
वायूगळतीनंतर अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार द्यावे लागले. परिसरातील अनेक कुत्र्यांचा वायूच्या प्रभावामुळे मृत्यू झाल्याची बाबही तक्रारीत नमूद करण्यात आली होती.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे मानकापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि कथित निष्काळजीपणाची चौकशी सुरू असून, पुढील तपास मानकापूर पोलीस करीत आहेत.