मालेगावच्या चार वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार-हत्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल; दोषीला फाशीची शिक्षा

    16-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नाशिक : मालेगावमधील चार वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने कठोर निर्णय सुनावला आहे. डोंगराळे येथील या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या विजय खैरनार याला मालेगाव अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

१६ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली होती घटना
मालेगावच्या डोंगराळे परिसरात १६ नोव्हेंबर २०२५ रोजी चार वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि हत्या झाल्याची घटना घडली होती. या अमानुष घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून करण्यात येत होती.

उज्ज्वल निकम यांनी मांडली सरकारची बाजू
या खटल्यात शासन नियुक्त विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारची बाजू मांडली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ या श्रेणीत मानून दोषीला मृत्युदंड सुनावला.

निकालाकडे राज्याचे लक्ष
या निर्णयामुळे पीडित बालिकेला न्याय मिळाल्याची भावना मालेगावमध्ये व्यक्त होत आहे. बालकांवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणांमध्ये कठोर शिक्षेची अपेक्षा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.