
Image Source:(Internet)
नाशिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या शाळांमध्ये २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू होणार असून, प्राथमिक शाळा १८ नोव्हेंबरला, तर माध्यमिक शाळा १९ नोव्हेंबरला पुन्हा सुरू होतील. सुट्टी संपल्यानंतर लगेचच परीक्षांचे नियोजन असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन करावे लागणार आहे.
यंदा प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना २ ते १७ नोव्हेंबरदरम्यान १५ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. दुसरीकडे, माध्यमिक शाळा २ ते १८ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असून, या विद्यार्थ्यांना १६ दिवसांची सुट्टी असेल. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या सुट्ट्यांमध्ये एक दिवसाचा फरक असल्याने दोन्ही विभागांना समान कालावधीची सुट्टी देण्याची मागणी पुन्हा समोर आली आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळांमध्ये शैक्षणिक कामकाजाला सुरुवात होताच परीक्षांची तयारी करावी लागणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सूचनेनुसार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संकलित चाचणी-१ आयोजित करण्याचे नियोजन आहे. या चाचणीत मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयांचा समावेश असेल, तर इतर विषयांच्या परीक्षा शाळा स्तरावर घेतल्या जाणार आहेत.
सुट्टी संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांत परीक्षांना सामोरे जावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करावे लागेल. शिक्षकांनाही कमी कालावधीत परीक्षांचे आयोजन करावे लागणार आहे. दरम्यान, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या सुट्ट्यांमध्ये समानता असावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून सातत्याने केली जात असतानाही यंदा एक दिवसाची तफावत कायम राहिली आहे.