
Image Source:(Internet)
लखनौ : उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापू लागले असून, पक्षांतराच्या घडामोडींनी वेग घेतला आहे. समाजवादी पक्षाच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या २४ तासांत समाजवादी पक्षाने भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या पाच नेत्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
बुधवारी समाजवादी पक्षाचे आमदार अभय सिंह, राकेश प्रताप सिंह आणि विनोद चतुर्वेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अभय सिंह हे गोसाईगंज, राकेश प्रताप सिंह हे गौरीगंज, तर विनोद चतुर्वेदी हे कालपी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. या पक्षप्रवेशामुळे सपाला धक्का बसला होता.
मात्र, त्यानंतर समाजवादी पक्षाने भाजपमधील नेत्यांना आपल्या गोटात आणत राजकीय समीकरणांना नवे वळण दिले. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी आमदार राजीव चन्ना, भाजपच्या मागासवर्गीय मोर्चाचे माजी राज्य कार्यकारिणी सदस्य मनमोहन सिंग सैनी, विभाग प्रमुख भवानी भीख शुक्ला, विधानसभा निवडणूक लढवलेले योगेंद्र नाथ मिश्रा आणि केशव पासी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.
याशिवाय बहुजन समाज पक्षातील काही नेत्यांनीही सपाची वाट धरली आहे. बसपाचे माजी आमदार विनय कुराली, माजी जिल्हा महासचिव नरेश प्रताप सिंह आणि माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सैनी यांच्यासह अन्य नेत्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून, सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांचे पक्षांतर महत्त्वाचे मानले जात आहे. भाजप आणि समाजवादी पक्षातील या राजकीय चढाओढीचा आगामी निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.