११ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ; केंद्र सरकारचा २,००९ कोटी रुपयांचा खर्च
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर देशभरातील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने भारतीय रेल्वेतील पात्र अराजपत्रित कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा उत्पादकतेशी निगडित बोनस (पीएलबी) देण्यास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा देशभरातील ११ लाख ४० हजार ७७० पात्र कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला कमाल १७ हजार ९५१ रुपये बोनस मिळू शकतो.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या निर्णयाची माहिती दिली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी वर्षभर केलेल्या कामाची दखल घेणे आणि त्यांना अधिक चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन देणे, हा या बोनसचा उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
कोणाला मिळणार बोनस?
रेल्वेतील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या पात्र अराजपत्रित कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे. यामध्ये ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, तंत्रज्ञ, पॉइंट्समन, पर्यवेक्षक, कार्यालयीन कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, बोनसची प्रत्यक्ष रक्कम संबंधित कर्मचाऱ्याची पात्रता आणि लागू नियमांनुसार निश्चित केली जाईल.
१७,९५१ रुपयांची कमाल रक्कम कशी ठरणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनसची गणना दरमहा ७ हजार रुपयांच्या निर्धारित वेतनमर्यादेच्या आधारे केली जाते. या मर्यादेनुसार ७८ दिवसांच्या बोनसची कमाल रक्कम १७ हजार ९५१ रुपये होते. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना समान रक्कम मिळेलच असे नाही. पात्रता आणि नियमानुसार प्रत्येकाची बोनसची रक्कम ठरवली जाईल.
बोनससाठी २,००९ कोटी रुपयांचा खर्च-
केंद्र सरकारने या बोनससाठी एकूण २ हजार ९.६१ कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. सणासुदीच्या काळात बोनसची रक्कम मिळाल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना घरगुती खर्च आणि दिवाळीच्या खरेदीसाठी आर्थिक मदत मिळू शकते.
बोनस खात्यात कधी जमा होणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी निगडित बोनस देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. साधारणपणे दसरा आणि दुर्गापूजेच्या काळात हा बोनस दिला जातो. यंदाही ७८ दिवसांच्या बोनसला मंजुरी मिळाली असली, तरी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची नेमकी तारीख अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.
रेल्वेची विक्रमी कामगिरी-
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतीय रेल्वेने १,६७० दशलक्ष टन मालवाहतूक केली, तर सुमारे ७.४१ अब्ज प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला. या कामगिरीत रेल्वेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत बोनस मंजूर करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.