
Image Source:(Internet)
नागपूर : नागपूर शहरात सुरू असलेल्या अवैध जुगारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. याच मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा आणि यशोधरानगर पोलिसांनी भिलगाव येथील ऋतुराज टाउन परिसरात छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. दुर्गा मंडपाच्या मागे ताशाच्या पत्त्यांवर पैशांचा डाव सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. घटनास्थळावरून एकूण ८७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रात्रीच्या गस्तीवेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून संबंधित ठिकाणी धाड टाकली. या पथकात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ आणि ५ मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह वाहनचोरी विरोधी पथकाचाही समावेश होता.
या कारवाईत विनीज विनोद मेहरुनिया, शाहरुख अंसारी अब्दुल जब्बार अंसारी, अस्मित रितेश चरोटे, राहुल अशोक धामती, कुणाल ऊर्फ गोलू अशोक धामती, अश्विन तुलाराम गवरे, अरुण राम कुशवाह आणि प्रतीक संतोष सोनवणे यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून २६ हजार ८८० रुपये रोख, ६० हजार ६०० रुपये किमतीचे सात मोबाईल फोन आणि जुगारासाठी वापरण्यात येणारी ५२ पत्त्यांची पाने हस्तगत केली. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी आरोपींना यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.