जप्त गांजाची किंमत ७ ते ८ लाख रुपये; सेंट्रल पोलिसांची कारवाई

Image Source:(Internet)
उल्हासनगर : उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना सेंट्रल पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे १५ किलो गांजा जप्त केला असून, त्याची अंदाजित किंमत ७ ते ८ लाख रुपये असल्याची माहिती आहे.
विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूने उतरून शांतिनगर परिसरातून जात असताना दोन्ही आरोपींना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक शीतल बामणे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी ही मोहीम राबवली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सौरभ वीरेंद्र पांडे आणि आकाश अरविंद साहनी अशी असून, दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला गांजा उल्हासनगरमध्ये कोणाला पुरवठा केला जाणार होता, तसेच या तस्करीच्या मागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास सेंट्रल पोलीस करत आहेत.