४० लाखांच्या दागिन्यांची लूट, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची माहिती

Image Source:(Internet)
नागपूर : हिंगणा रोडवरील ढोमणे ज्वेलर्समध्ये झालेल्या लाखोंच्या लुटीचा तपास करत नागपूर पोलिसांनी उत्तर प्रदेशातून चार संशयित आरोपींना अटक केली आहे. ३ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेत दुकानातील सुमारे ४० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
कर्मचाऱ्याला धमकावून दागिने पळवले-
हिंगणा रोडवरील महाकाली बारसमोर असलेल्या ढोमणे ज्वेलर्समध्ये ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.४० ते ४.५५ दरम्यान चार जणांनी प्रवेश केला. दुकानात कर्मचारी शुभम खेमराज हाडगे उपस्थित असताना आरोपींनी बंदुकीसारख्या वस्तूचा धाक दाखवून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्यासोबत मारहाण करून आरोपींनी अंदाजे ३५० ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
तांत्रिक तपासातून आरोपींचा माग-
घटनेनंतर एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखेने तपासाला वेग दिला. परिसरातील ३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींच्या हालचाली आणि पळून जाण्याचा मार्ग शोधण्यात आला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी उत्तर प्रदेशात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांची विशेष पथके तेथे पाठवण्यात आली.
या कारवाईत अभिषेक सिंह ठाकूर याला बरेली येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जयराम ऊर्फ जोगिंदर अशोक सिंह ठाकूर (१९) आणि शुभांकित निलेशकुमार चतुर्वेदी (२२) यांना नोएडा, तर राजन सामी शर्मा (२९) याला मेरठ येथून ताब्यात घेण्यात आले.
लुटलेले दागिने हस्तगत करण्याचे आव्हान-
पोलिसांनी या गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच-४९-बी-९१९२ क्रमांकाची फॉर्च्युनर कार जप्त केली आहे. मात्र, लुटलेले दागिने अद्याप हस्तगत करायचे असून या टोळीतील अन्य सदस्यांचा शोधही सुरू आहे. आरोपींचा इतर गुन्ह्यांतील सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.