CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांचा दणका;सौरव दास, आशुतोष रांका यांची तिहारमध्ये रवानगी

    14-Oct-2026
Total Views |
जंतरमंतरवरील आंदोलन प्रकरणात पाच दिवसांची कोठडी; अजिंक्य शिंदे यांना दिलासा

Image Source:(Internet)

नवी दिल्ली
: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणातील (SIR) कथित अनियमिततांविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) दोन नेत्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले आहे. राष्ट्रीय प्रवक्ते सौरव दास आणि सह-संयोजक आशुतोष रांका यांना विशेष कार्यपालक दंडाधिकाऱ्यांनी पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दुसरीकडे, याच प्रकरणात ताब्यात घेतलेल्या अजिंक्य शिंदे यांची बाँड भरल्यानंतर सुटका करण्यात आली.

जंतरमंतर येथे आंदोलनादरम्यान तिरंगा फडकवून पोलिसांचे बॅरिकेड्स तोडल्याचा आणि प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याचा आरोप या नेत्यांवर आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी यापूर्वी शांतता राखण्याचा आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करण्याचा बाँड भरला होता. असे असतानाही त्यांनी पुन्हा प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याचा दावा पोलिसांनी केला. यानंतर दोघांना पाच दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

या कारवाईनंतर CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर टीका केली. “जंतरमंतरवर जाऊन भारताचा तिरंगा फडकवणे हा गुन्हा आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, पक्षाच्या कायदेशीर विभागाच्या प्रमुख रत्ना सिंह यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. तिन्ही नेत्यांना वकिलांशी संपर्क साधण्याची संधी २४ तासांहून अधिक काळ दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरला अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळल्याचा दावा CJP ने केला आहे. रामलीला मैदान, बुरारी मैदान आणि सीबीडी मैदान ही पर्यायी आंदोलनस्थळे निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.