नागपुरात अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप; शेजारी तरुणावर गुन्हा दाखल

    14-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : नागपूरच्या लकडगंज परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप एका ३० वर्षीय तरुणावर करण्यात आला आहे. मुलीला पाहून अश्लील भाषेचा वापर करणे आणि हातवारे करून आक्षेपार्ह इशारे करणे, असे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी एकाच परिसरात शेजारी राहतात. त्यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये बोलणे बंद होते. याच वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपी मुलीला उद्देशून अश्लील भाषा वापरत असल्याचे आणि आक्षेपार्ह हातवारे करत असल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

१२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या कथित प्रकारासंदर्भात तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सूरज अग्रवाल (वय ३०) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्याच्या कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणात तक्रारीतील आरोपांची पडताळणी केली जात असून, लकडगंज पोलीस पुढील तपास करत आहेत.