तातडीच्या मदतीसाठी राज्य सरकारचा निर्णय; शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार

Image Source:(Internet)
मुंबई : दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. दिवाळीपूर्वीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यंदा दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने ऑक्टोबरमध्येच दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील शासन निर्णय काढला असून, आज पूरक शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. दुष्काळ निवारणासाठी १२ योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या निर्धारित नियमांनुसार आणि टप्प्यांनुसार पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया दिवाळीपूर्वी पूर्ण होणे कठीण असल्याने राज्य सरकारने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून मदत प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील मदतही देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दिवाळीपूर्वी खात्यात पैसे जमा होणार-
दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सणाच्या काळात त्यांच्या हातात काही रक्कम असावी, या उद्देशाने प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रीम मदत म्हणून देण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.