
Image Source:(Internet)
नागपूर : बँड वाजवण्याच्या कामाच्या पैशांवरून निर्माण झालेल्या वादातून नागपुरात एका तरुणाला जीव गमवावा लागला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंड टोली परिसरात झालेल्या चाकूहल्ल्यात अभिजीत ऊर्फ बाबा सिडाम (२९) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. मेयो रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
अभिजीत हा पांढराबोडी परिसरातील रहिवासी असून, बँड वाजवण्याचे काम करीत होता. काही सहकाऱ्यांसोबत तो कारंजा येथे कार्यक्रमासाठी गेला होता. कार्यक्रमाच्या मोबदल्यावरून आर्थिक व्यवहारात मतभेद निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आयोजकांकडून पैसे मिळाले नसल्याने सहकाऱ्यांचे पैसे देण्यावरून वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर बँडसाठी वापरल्या जाणाऱ्या मिक्सर मशीनवरूनही वाद चिघळल्याची माहिती समोर आली आहे.
याच पार्श्वभूमीवर गोंड टोली परिसरात रात्री उशिरा अभिजीत आणि काही तरुणांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि चार ते पाच तरुणांनी अभिजीतवर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे ठरले.
घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी तपास सुरू केला. चार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. आर्थिक व्यवहारातून नेमका वाद कसा वाढला आणि हल्ल्यात कोणाचा सहभाग होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.