सीताबर्डीत भरधाव कारची धडक; २९ वर्षीय तरुण गंभीर जखमी, चालक पसार

    13-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरात भरधाव वाहनांमुळे अपघातांचे सत्र सुरूच असून, सीताबर्डी परिसरात एका बेदरकार कारचालकाने पादचाऱ्याला धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना घडली आहे. या अपघातात अक्षय ढगे (२९) हे गंभीर जखमी झाले आहेत. धडकेनंतर कारने विजेच्या खांबालाही धडक दिली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती असून, सीताबर्डी पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय ढगे हे अंबाझरीतील पांढराबोडी ट्रस्ट लेआउट येथील रहिवासी आहेत. ११ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सुमारे एक वाजता ते रस्त्यावरून जात असताना छोटी लौहरी परिसरातील मित्तल इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे अक्षय रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या उजव्या पायाला अनेक फ्रॅक्चर झाले असून, त्यांना उपचारासाठी वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार विजेच्या खांबावर जाऊन आदळली. या घटनेत शासकीय मालमत्तेचेही नुकसान झाले. मात्र, अपघातानंतर जखमीची मदत करण्याऐवजी चालक घटनास्थळावरून पसार झाला.

अक्षय हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या अपघातामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारची ओळख पटवून फरार चालकाला तातडीने अटक करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. सीताबर्डी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.