प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाराज; गैरहजेरीबाबत नगरसेवकांना द्यावा लागणार जाब

Image Source:(Internet)
पुणे : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रमाला अनुपस्थित राहणे भाजपच्या सुमारे १०० नगरसेवकांना महागात पडण्याची शक्यता आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला निरोप देऊनही गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.
दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपचे आमदार उपस्थित होते. मात्र, पक्षाकडून निरोप देऊनही शंभराहून अधिक नगरसेवक कार्यक्रमाला पोहोचले नाहीत. त्यामुळे पक्षाच्या शिस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
नगरसेवकांच्या अनुपस्थितीची बाब लक्षात येताच सभागृहनेते गणेश बिडकर यांनी उपस्थित नगरसेवकांची नोंद घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी स्वतः सभागृहात फिरून उपस्थितीची खातरजमा केली. आता गैरहजर नगरसेवकांना अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करावे लागणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या सुरुवातीलाच नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे भाजपमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र आहे.