
Image Source:(Internet)
मुंबई : मुंबईतील धारावीच्या पुनर्विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. धारावीतील पात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी माटुंगा येथील २२ एकर रेल्वेच्या जागेवर १०,४३२ घरांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी यांच्या हस्ते सोमवारी या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत माटुंगा येथे १० टॉवर्स बांधण्यात येणार असून, त्यामध्ये पुनर्वसनासाठी १०,४३२ सदनिका उभारल्या जातील. याशिवाय १,३७९ व्यावसायिक आणि औद्योगिक युनिट्सचीही निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे रहिवाशांना निवासासोबतच व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
पात्र रहिवाशांना मिळणार ३५० चौरस फुटांचे फ्लॅट्स-
या प्रकल्पात पात्र ठरणाऱ्या रहिवाशांना प्रत्येकी ३५० चौरस फुटांची सदनिका दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात धारावीतील सेक्टर ६ आणि सेक्टर १ मधील पात्र रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यानंतर धारावीतील अन्य पात्र रहिवाशांसाठी प्राधान्याने सुमारे ४,५०० सदनिका उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
बालवाडीपासून उद्यानापर्यंत सुविधा-
पुनर्वसन इमारतींमध्ये रहिवाशांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन विविध सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये बालवाडी, सामुदायिक सभागृह, पोडियम गार्डन आणि बसण्यासाठी स्वतंत्र जागांचा समावेश असेल. आधुनिक सुविधांसह सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
इमारतींच्या देखभालीसाठी प्रत्येक पुनर्वसित इमारतीतील १० टक्के व्यावसायिक जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. या जागांमधून मिळणाऱ्या महसुलाचा उपयोग सामायिक सुविधांच्या देखभालीसाठी केला जाणार आहे. रहिवाशांना सदनिकांचा ताबा दिल्यानंतर सुरुवातीच्या दहा वर्षांपर्यंत इमारती आणि सामायिक पायाभूत सुविधांची देखभाल संबंधित विकासक कंपनी करणार आहे.
या कार्यक्रमाला राज्याच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता उपस्थित होते. या प्रकल्पामुळे धारावीतील पात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी नव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.