दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे
Image Source:(Internet)
नागपूर : गोतस्करीच्या (Cattle smuggling) संशयावरून नागपूरच्या मानकापूर परिसरात वाद उफाळल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूर येथील कार अडवून चालकासह त्याच्या मित्रांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, संतप्त व्यक्तींनी कारची तोडफोड केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल केल्याने मानकापूर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंदवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील शुभम शंकर जवाडे हे आपली पांढऱ्या रंगाची अर्टिगा कार अय्यूब हायड्रॉलिक्स गॅरेजमधून दुरुस्त करून घेतल्यानंतर चाचणीसाठी बाहेर पडले होते. त्यावेळी सय्यद बाबा नावाच्या व्यक्तीने त्यांची कार थांबवून जनावरांच्या तस्करीबाबत जाब विचारल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर काही अन्य व्यक्तींनाही घटनास्थळी बोलावण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी वाद वाढून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. तसेच कारची चावी आणि मोबाईल फोन काढून घेतल्याचा आरोप शुभम जवाडे यांनी केला आहे. लोखंडी रॉडने कारवर हल्ला करून तिचे नुकसान करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दुसरीकडे, संबंधित कारचा चंद्रपूरमध्ये कथित गोतस्करीसाठी वापर झाल्याच्या आरोपाचाही पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंच्या तक्रारींची पडताळणी केली जात आहे.
मानकापूर पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल केले असून, घटनेमागील नेमके सत्य शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.