सरन्यायाधीशांनी भेट नाकारल्यानंतर इंडिया आघाडीचा मोठा निर्णय; राहुल गांधींची घोषणा, सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार

    12-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर विरोधकांनी आता पुढील कायदेशीर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. एसआयआर प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतचोरीचे आरोप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली.

दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या भूमिकेबाबत माहिती दिली. भारतीय लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त करत काँग्रेस अध्यक्ष आणि आपण सरन्यायाधीशांना पत्र पाठवले होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, भेटीसाठी वेळ देण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा मार्ग अवलंबण्याची सूचना मिळाल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले.

त्यानुसार, इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे नेते एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत कथितरित्या झालेल्या गैरप्रकारांचा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे राहुल गांधी यांच्या घोषणेतून स्पष्ट झाले.

दरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या पत्राला उत्तर दिल्याचे सांगितले. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेटणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामागील कारणेही पत्राद्वारे कळवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे प्रत्येक नागरिकासाठी खुले आहेत. सामान्य नागरिक असो किंवा लोकप्रतिनिधी, कोणालाही आपल्या तक्रारी आणि समस्यांसाठी याचिका दाखल करता येते. कायद्याच्या चौकटीत संबंधित प्रकरणाची सुनावणी घेऊन योग्य तो न्याय दिला जाईल, अशी भूमिका सरन्यायाधीशांनी मांडली.आता इंडिया आघाडी सर्वोच्च न्यायालयात कोणते मुद्दे उपस्थित करते आणि या याचिकेवर न्यायालयाची भूमिका काय असते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.