
Image Source:(Internet)
नागपूर : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी प्रशासनाकडून पंचनामे आणि कागदपत्रांची नोंदणी सुरू आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
पावसाअभावी सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी आणि मका या पिकांच्या उत्पादनात ३१ ते ८७ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे पंचनाम्यांतून समोर आले आहे. महसूल यंत्रणेने तीन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राचे पंचनामे केले असले, तरी सध्या दोन हेक्टरचीच माहिती ऑनलाइन अपलोड केली जात आहे. तीन हेक्टरची मर्यादा लागू झाल्यास उर्वरित क्षेत्राची माहितीही सादर करता येणार आहे.
भरपाईसाठी ही कागदपत्रे द्या-
शेतकऱ्यांनी शेतीचा सातबारा उतारा, ८-अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक आणि फार्मर आयडी ही कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करावीत. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या समितीकडून पंचनाम्यांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केली जात आहे.
भरपाईसाठी ३० हजार कोटींची गरज-
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे सुमारे १७ हजार ५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. राज्य सरकारकडूनही सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी एकूण अंदाजे ३० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.