‘मोदी सरकारची हुकूमशाही इंग्रजांनाही मागे टाकणारी’; नाना पटोलेंचा केंद्रावर प्रहार

    10-Oct-2026
Total Views |
 
Patole
Image Source:(Internet)
 
नागपूर : देशातील लोकशाही व्यवस्था धोक्यात आली असून, केंद्रातील मोदी सरकार इंग्रजांपेक्षाही क्रूरपणे वागत असल्याचा घणाघात काँग्रेस आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. दिल्लीतील सीजेपी आंदोलनावरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप करतानाच नागपुरात गांधी घराण्याच्या नेत्यांच्या नावाने करण्यात आलेल्या पिंडदान आंदोलनाचाही त्यांनी निषेध केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अंतर्गत परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी आगामी राजकीय घडामोडींबाबतही सूचक विधान केले.
 
राहुल गांधी यांच्या आंदोलनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरू असून, हजारो जवान तैनात करण्यात आल्याचे ते म्हणाले. दिल्लीतील मेट्रो, रेल्वे आणि इंटरनेट सेवा बंद केल्याचा दावाही त्यांनी केला. सरकार मतचोरीच्या माध्यमातून सत्तेत आल्याचा आरोप करत, निवडणूक आयोग आणि भाजपविरोधात देशभरात आंदोलन उभे राहील, असा इशारा त्यांनी दिला.
 
नागपुरातील पिंडदान आंदोलनावर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी भाजपच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आणि बलिदान दिले. अशा नेत्यांविषयी अवमानकारक भूमिका घेणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. भाजपचा उगम नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला; मात्र आता संघातच अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचा दावा करत, येत्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
 
मतदानाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत पटोले यांनी लोकशाहीत मतदान पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे सांगितले. मतचोरीच्या आरोपांमुळे निवडणूक व्यवस्थेबाबत जनतेच्या मनात शंका निर्माण झाल्याचे ते म्हणाले. नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मतपत्रिकेवर होणार असल्याने काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांना विजयाची खात्री असल्याचा दावाही त्यांनी केला.
 
शेतकरी आत्महत्येवरून राज्य सरकारवर टीका
भंडारा येथे पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासमोर एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा उल्लेख करत पटोले यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप त्यांनी केला.
 
कराळे गुरुजींच्या मतांबाबत पटोलेंचे विधान
राहुल गांधी यांनी मांडलेल्या आर्थिक मुद्द्यांचा संदर्भ देत पटोले यांनी रुपयाच्या घसरत्या मूल्यावरही भाष्य केले. दरम्यान, नितेश कराळे मास्तर यांच्याबाबत बोलताना, त्यांना मिळणाऱ्या मतांचा मोठा हिस्सा अभिजीत वंजारी यांच्याकडे जाण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आगामी निवडणुकीत वंजारी यांना दुसऱ्या संस्थेतून संधी देण्याचा विचार असून, त्यावेळी कराळे गुरुजींच्या नावाचाही विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.