
Image Source:(Internet)
मुंबई -दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातग्रस्त कंटेनरच्या चालकाला वाचवण्यासाठी धावलेल्या पाच जणांना भरधाव ट्रकने धडक दिली. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून येणाऱ्या कंटेनर ट्रकने रस्त्याच्या कडेला बिघाडामुळे गेल्या दोन दिवसांपासून उभ्या असलेल्या सहाचाकी ओपन-बॉडी ट्रेलरला मागून धडक दिली. या धडकेत कंटेनरचा चालक केबिनमध्ये अडकला.
चालकाला अडकलेले पाहून काही प्रवासी आणि मागून येणाऱ्या दोन वाहनांतील चालकांनी मदतीसाठी आपली वाहने थांबवली. ते चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच मागून आलेल्या तिसऱ्या अवजड वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
या दुसऱ्या अपघातात पाच जण गंभीरपणे बाधित झाले. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. या घटनेमुळे महामार्गावरील अपघातानंतर मदतीसाठी थांबलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.