ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचे आंदोलन; दिल्ली पोलिसांची कारवाई, शेकडो कार्यकर्ते ताब्यात

    10-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीने दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) वतीने आज, १० ऑक्टोबर रोजी जंतर-मंतर येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करत सीजेपीच्या शेकडो कार्यकर्त्यांसह कंटेंट क्रिएटर्सनाही ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. सीजेपीशी संबंधित अभिजीत दिपके हेही लवकरच दिल्लीत पोहोचणार आहेत.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेमधून शुक्रवारी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच मध्य दिल्लीतील मोबाइल इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

आंदोलकांना जंतर-मंतरवर पोहोचण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये केंद्रीय सशस्त्र दलाचे सुमारे २३ हजार जवान आणि दिल्ली पोलिसांचे ५ हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यापूर्वीही विरोधकांनी लावून धरली होती. राहुल गांधी यांच्यासह काही नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आंदोलन केले होते. आता सीजेपीच्या आंदोलनाला प्रशासन कशा प्रकारे हाताळते आणि अभिजीत दिपके यांच्या आगमनानंतर काय घडामोडी होतात, याकडे लक्ष लागले आहे.