सणासुदीआधी व्यावसायिक LPG सिलिंडर महागला; मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये मोठी दरवाढ

    01-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. प्रमुख शहरांमध्ये सिलिंडरच्या किमतीत सुमारे ६२ ते ७१ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायांच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

इंडियन ऑइलच्या सुधारित दरांनुसार, मुंबईत व्यावसायिक LPG सिलिंडर ६३ रुपयांनी महागून २,७६४ रुपये झाला आहे. दिल्लीत ६२.५० रुपयांची वाढ झाल्याने १९ किलोचा सिलिंडर आता २,८१० रुपये झाला आहे.

चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा दर २,९८३ रुपये, तर लखनऊमध्ये ६२.५० रुपयांच्या वाढीनंतर २,९३२.५० रुपये झाला आहे. पाटणामध्ये सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली असून, येथे सिलिंडरच्या दरात ७१.५० रुपयांची वाढ होऊन किंमत ३,१००.५० रुपये झाली आहे.

यापूर्वी सप्टेंबरमध्येही व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात ९.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा दरवाढ झाल्याने सणासुदीच्या काळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, घरगुती वापराच्या LPG सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.