नागपुरात अजनी पोलिसांची कारवाई; 11 ग्रॅम MDसह आरोपी जेरबंद

    01-Oct-2026
Total Views |
सामाजिक सुरक्षा पथकाने 44,980 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त; चंद्रपूरमधील जुन्या गुन्ह्याचाही तपास

Image Source:(Internet)

नागपूर :
शहरात अमली पदार्थांच्या विक्री आणि तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असतानाच सामाजिक सुरक्षा पथकाने अजनी परिसरात छापा टाकून एका व्यक्तीला MDसह अटक केली. आरोपीकडून 11 ग्रॅम मेफेड्रोन (MD), मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 44 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

30 सप्टेंबरच्या रात्री अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शताब्दी चौक ते ओंकारनगर मार्गावर सामाजिक सुरक्षा पथकाने संशयावरून अब्दुल शिराज अब्दुल गफार (38) याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडे 33 हजार 480 रुपये किमतीची 11 ग्रॅम MD आढळून आली. याशिवाय 10 हजार रुपयांचा मोबाईल आणि 1 हजार 500 रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली.

अब्दुल हा मूळचा ओडिशातील कटक जिल्ह्यातील असून सध्या नागपुरातील काशीनगर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे, त्याच्याविरुद्ध चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये यापूर्वी गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.

या जुन्या प्रकरणात ‘राहुल’ आणि ‘डेवील’ या दोघांची नावे समोर आली असून ते फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे नागपुरात जप्त करण्यात आलेल्या MDचा पुरवठा कुठून झाला आणि त्याचा चंद्रपूरमधील आरोपींशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

अजनी पोलिसांनी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, अमली पदार्थांच्या या नेटवर्कमागील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.