Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या राजकीय हालचालींच्या दरम्यान अनेक नेत्यांचे पक्षांतरही चर्चेचा विषय ठरत आहे. मनसेतून काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज ठाकरे यांच्या पक्षासमोर आव्हान उभं राहिलं आहे.
डोंबिवलीतील मनसेचे काही पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर आणि संतोष धुरी यांनी पक्ष सोडल्यानंतर संदीप देशपांडे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चर्चांवर स्वतः संदीप देशपांडेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
जबाबदारी न मिळाल्याची नाराजी नाही संदीप देशपांडे म्हणाले की, संतोष धुरी पक्ष सोडून गेल्यानंतर माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. जाहीरनामा किंवा वचननामा तयार करताना मला विश्वासात घेतलं गेलं नाही, मात्र याबाबत माझ्या मनात कोणताही राग नाही. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मला या जबाबदारीसाठी योग्य समजलं नसेल, तर ते स्वाभाविक आहे. प्रत्येक गोष्ट आपल्यालाच जमते असा फाजील आत्मविश्वास माझा नाही. माझ्यापेक्षा काही जबाबदाऱ्या बाळा नांदगावकर किंवा इतर नेते अधिक चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात, असंही त्यांनी नमूद केलं.
नाराजीच्या चर्चांवर ठाम भूमिका नाराजीच्या चर्चांवर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, संतोष धुरी यांनी जो निर्णय घेतला तो योग्य की अयोग्य यावर मी भाष्य करणार नाही. प्रत्येकजण आपापल्या विचाराने निर्णय घेतो. मात्र उद्या मला असं वाटलं की माझ्या उपस्थितीमुळे पक्षाला फायदा होत नाही, उलट मी ओझं ठरत आहे, तर मी स्वतःहून बाजूला होईन.
ते पुढे म्हणाले, राजकारण असो वा खेळ, जोपर्यंत आपण अॅसेट असतो तोपर्यंतच मैदानात राहणं योग्य असतं. जेव्हा आपण लायबेलिटी ठरतो, तेव्हा बाजूला होणं गरजेचं असतं. पक्षासाठी ओझं ठरण्यापेक्षा बाजूला होणं हाच योग्य निर्णय आहे. देवाच्या कृपेने अद्याप माझ्यावर अशी वेळ आलेली नाही, पण जर ती आली, तर मी कोणताही आग्रह न धरता स्वतः निर्णय घेईन, असा ठाम विश्वास संदीप देशपांडेंनी व्यक्त केला आहे.