Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
फिल्म ‘धुरंधर’ (Dhurandhar) वर संयुक्त अरब अमिरातीसह पश्चिम आशियातील काही देशांनी लादलेल्या बंदीविरोधात इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (आयएमपीपीए) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली आहे. ही बंदी ‘एकतर्फी’ असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप आयएमपीपीएने केला आहे.
पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात आयएमपीपीएने नमूद केले आहे की, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (सीबीएफसी) प्रमाणपत्र मिळूनही ‘धुरंधर’ या चित्रपटावर संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत, कतार, ओमान आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
“सदर देशांनी लादलेली एकतर्फी आणि अनुचित बंदी उठवण्यासाठी आपण हस्तक्षेप करावा,” अशी विनंती आयएमपीपीएने पत्राद्वारे केली आहे. तसेच, सीबीएफसीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असून, अशा प्रकारची बंदी ही निर्मात्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
गेल्या महिन्यात खाडी देशांमध्ये ‘धुरंधर’वर बंदी घालण्यात आल्याच्या वृत्तानंतर हे पत्र लिहिण्यात आले आहे. आयएमपीपीएने हे पत्र केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनाही पाठवले आहे.
दिग्दर्शक आदित्य धर लिखित व दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा गुप्तहेरपट प्रकारातील थरारक चित्रपट आहे. कंधार विमान अपहरण, 2001 सालचा संसद हल्ला आणि 26/11 मुंबई दहशतवादी हल्ले यांसारख्या महत्त्वाच्या भू-राजकीय व दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर खुफिया मोहिमांची ही कथा उलगडते.