नागपूर :
आधार (Aadhaar) कार्ड हे आता केवळ ओळखपत्र न राहता बँकिंग सेवा, शासकीय योजना, अनुदान आणि विविध व्यवहारांसाठी अनिवार्य बनले आहे. मात्र कागदी आधार कार्ड लवकर खराब होणे, फाटणे किंवा पाण्यामुळे नासणे अशा तक्रारी सातत्याने येत होत्या.
ही अडचण दूर करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून PVC आधार कार्डची सुविधा अधिक सोपी करण्यात आली आहे. हे कार्ड टिकाऊ, आकर्षक आणि क्रेडिट कार्डप्रमाणे पाकिटात सहज मावणारे आहे. मात्र, दुसरीकडे आधारशी संबंधित काही सेवांचे शुल्क वाढवण्यात आले असून नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
PVC आधार कार्ड म्हणजे काय?
PVC आधार कार्ड हे प्लास्टिकचे बनलेले असून एटीएम कार्डप्रमाणे मजबूत असते. या कार्डमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अनेक आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. सुरक्षित QR कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट आणि गिलोश डिझाइन यामुळे बनावट आधार कार्ड तयार करणे कठीण झाले आहे. पाण्याने खराब न होणारे आणि दीर्घकाळ टिकणारे हे कार्ड नागरिकांसाठी अधिक उपयुक्त ठरत आहे.
आधार अपडेटसाठी नवीन शुल्क काय?
स्वतः ऑनलाइन पद्धतीने नाव किंवा पत्ता दुरुस्त केल्यास १४ जून २०२६ पर्यंत ही सेवा पूर्णतः मोफत असेल.आधार सेवा केंद्रावर जाऊन नाव किंवा पत्ता बदलण्यासाठी आता ५० रुपयांऐवजी ७५ रुपये शुल्क आकारले जाईल.
केंद्रावर फोटो अपडेट करण्यासाठी १२५ रुपये मोजावे लागतील.साधे आधार कार्ड पुन्हा काढून घ्यायचे असल्यास ४० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
घरबसल्या PVC आधार कार्ड कसे मागवायचे?
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
‘Get Aadhaar’ विभागात ‘Order Aadhaar PVC Card’ या पर्यायावर क्लिक करा.
१२ अंकी आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी टाका व कॅप्चा भरा.
नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून पडताळणी पूर्ण करा.
५० रुपये (GST व स्पीड पोस्ट शुल्कासह) ऑनलाइन भरा.
पेमेंट पूर्ण होताच PVC आधार कार्ड थेट टपालाद्वारे तुमच्या घरी पाठवले जाईल.
वाढीव शुल्कामुळे केंद्रावर जाऊन अपडेट करणे महाग पडणार असले तरी, ऑनलाइन सुविधा मोफत असल्याने नागरिकांनी डिजिटल पर्यायाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.