Image Source:(Internet)
मुंबई:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कथितपणे सुरू असलेल्या गैरप्रकारांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महानगरपालिका निवडणुकांत भाजप, शिंदे गटाची शिवसेना तसेच अजित पवार गट दबावाचे राजकारण करत मोठ्या प्रमाणावर बिनविरोध उमेदवार निवडून आणत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अशा प्रकारांमुळे लोकशाहीच्या मुळावरच घाव बसत असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
सात ते आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडी होणे संशय निर्माण करणारे असल्याचे सुळे म्हणाल्या. NOTA चा पर्याय उपलब्ध असतानाही मतदारांना मतदानाचा अधिकार वापरण्यापासून रोखले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
धमकी, दहशत आणि आर्थिक बळाचा वापर
निवडणूक प्रक्रियेत धमक्या, दहशत, बंदुकीचा धाक, प्रचंड प्रमाणात पैशांचा वापर, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव, ब्लॅकमेलिंग, बोगस मतदान तसेच मतदारांना आमिषे दाखवण्याचे प्रकार वारंवार समोर येत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. या साऱ्या घडामोडी घडत असताना निवडणूक आयोगाकडून होत असलेले दुर्लक्ष अधिकच धोकादायक असल्याचे त्या म्हणाल्या. लोकशाहीचे रक्षण करायचे असेल तर या गैरप्रकारांवर तातडीने कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या विषयावर यापूर्वी संसदेत आवाज उठवला असून, पुढेही हा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
६९ पैकी ६८ जागा बिनविरोध?
राज्यभरातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी आक्रमक प्रयत्न करत असल्याचे चित्र असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र हे प्रयत्न लोकशाही मूल्यांना तिलांजली देणाऱ्या मार्गाने होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा कथित धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
तसेच मनसे आणि ठाकरे गटाकडूनही उमेदवारांना धमकावण्यात आल्याचे आरोप समोर आले आहेत. महाराष्ट्रातील ६९ पैकी तब्बल ६८ जागांवर सत्ताधारी गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून येणे ही अत्यंत चिंताजनक बाब असून, निवडणूक यंत्रणा गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर असल्याचे विरोधकांचे मत आहे. सध्या पैशाची ताकद आणि राजकीय दबाव यांच्याच जोरावर निवडणूक निकाल ठरत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.