Image Source:(Internet)
मुंबई:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे भाजपवर (BJP) केलेल्या तीव्र टीकेनंतर राज्यातील राजकारण अधिक तापले आहे. “भाजपची राक्षसी भूक मला सहन होत नाही,” असा आरोप अजित पवारांनी केल्यानंतर महायुतीतील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट करत भाजपवर थेट ब्लॅकमेलिंगचे आरोप केले आहेत.
संजय राऊत यांनी दावा केला की, भाजपने अजित पवार यांना दबावाखाली ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. एवढ्यावरच न थांबता, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनाही तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही ब्लॅकमेल करून पक्षफोड करण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. “तुमचा सगळा खेळ ब्लॅकमेलिंगचा आहे. तुम्ही मोठे जुगारी आणि मोठे ब्लॅकमेलर आहात,” अशा शब्दांत राऊतांनी भाजपवर घणाघाती टीका केली.
राऊत नेमके काय म्हणाले?
राज्यात सध्या फाईल्स उघडण्याच्या नावाखाली दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत राऊत म्हणाले, “ही फाईल उघड, ती फाईल उघड, अशा धमक्यांवर सगळा कारभार चालतो आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण—या तिघांनाही ब्लॅकमेल करून पक्ष फोडण्यात आले. हे सगळे महाराष्ट्र पाहत आहे.”
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना “इतिहासाची पाने उघडायला भाग पाडू नका,” असा इशारा दिला होता. यावर पलटवार करताना संजय राऊत म्हणाले, “बावनकुळे काय न्यायाधीश आहेत का? की तपास अधिकारी? ते कोणत्या अधिकारात बोलत आहेत? फडणवीस काय बोलतात, तेही स्पष्ट करा. मग त्यांना समोर बसवा आणि सावरकरांचे धडे द्या,” असा टोला त्यांनी लगावला.
सत्तेवरच नाती टिकतात?
पुढे बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरही टीकेची झोड उठवली. “यांचा संबंध फक्त सत्ता, पैसा आणि गुंडगिरीशी आहे. जोपर्यंत सत्ता तुमच्याकडे आहे, तोपर्यंत ते तुमच्यासोबत राहतील. उद्या सत्ता बदलली, तर हेच लोक आमच्या दारात येऊन उभे राहतील,” असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला. त्यांच्या या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार चर्चांना उधाण आले आहे.