नेस्लेच्या बेबी फूडवर संशयाचे सावट; २५ देशांतून मोठ्या प्रमाणावर उत्पादन परत

    07-Jan-2026
Total Views |
 
Nestle
 Image Source:(Internet)
वॉशिंग्टन:
जगप्रसिद्ध अन्नप्रक्रिया कंपनी नेस्ले (Nestle) सध्या मोठ्या वादात अडकली आहे. लहान मुलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या काही बेबी फूड उत्पादनांमध्ये घातक रसायन असण्याची शक्यता समोर आल्यानंतर कंपनीने तब्बल २५ देशांमधून काही विशिष्ट बॅचेस बाजारातून तातडीने परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेस्लेच्या इन्फंट न्यूट्रिशन श्रेणीतील काही उत्पादनांमध्ये ‘सेरुलॉइड’ नावाचा अपायकारक घटक मिसळला असण्याचा संशय आहे. कोणतीही संभाव्य जोखीम टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
 
नेस्लेने जारी केलेल्या निवेदनानुसार, उत्पादन प्रक्रियेदरम्यान वापरण्यात आलेल्या एका कच्च्या मालामध्ये तांत्रिक बिघाडामुळे दूषित घटक मिसळले असण्याची शक्यता आहे. हा घटक बालकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतो. तज्ज्ञांच्या मते, अशा घटकांमुळे उलटी, मळमळ, तसेच पचनसंस्थेशी संबंधित आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
दरम्यान, ब्रिटनच्या फूड स्टँडर्ड्स एजन्सी (FSA) नेही या प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली असून, संबंधित घटक उष्णतेला प्रतिरोधक असल्यामुळे उकळत्या पाण्यातही नष्ट होत नाही, ही बाब अधिक गंभीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 
कोणते ब्रँड्स संशयाच्या यादीत?
या व्यापक रिकॉलमध्ये नेस्लेचे SMA, BEBA आणि NAN हे प्रसिद्ध बेबी फूड ब्रँड्स समाविष्ट आहेत. जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, ब्रिटनसह अर्जेंटिना, तुर्की यांसारख्या देशांतील बाजारपेठांवर याचा परिणाम झाला आहे. एकूण २५ देशांमधून ही उत्पादने मागे घेण्यात येत असून, नेस्लेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रिकॉल मानला जात आहे.
 
पालकांसाठी कंपनीचे आवाहन
सध्या या उत्पादनांमुळे कोणत्याही बालकाला प्रत्यक्ष इजा झाल्याची अधिकृत नोंद नाही, असे नेस्लेने स्पष्ट केले आहे. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने पालकांनी आपल्या बेबी फूडवरील बॅच कोड तपासावा आणि तो रिकॉल यादीत असल्यास ते उत्पादन वापरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित उत्पादने परत केल्यास ग्राहकांना संपूर्ण परतावा देण्यात येईल, असेही कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे.