Image Source:(Internet)
नांदेड : शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीतील गंभीर त्रुटी उघड करणारी धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात समोर आली आहे. किनवट तालुक्यातील इस्लापूर गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात अळ्या आढळून आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. तीव्र भूक लागलेल्या चिमुकल्यांनी भाजीतून कडिपत्ता काढावा, त्याच पद्धतीने अळ्या बाजूला सारून जेवण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत रोजच्या प्रमाणे विद्यार्थ्यांना जेवण वाटप करण्यात आले होते. मात्र जेवण सुरू असतानाच अन्नात अळ्या असल्याचे निदर्शनास आले. तरीही भूक सहन न झाल्याने काही विद्यार्थ्यांनी अळ्या काढून उरलेले अन्न खाल्ले. हा संपूर्ण प्रकार पाहून ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले असून, त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला.
या घटनेमुळे शालेय पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राबवली जाणारी योजना प्रत्यक्षात मात्र निष्काळजीपणामुळे धोक्यात येत असल्याचा आरोप होत आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याची भावना पालक आणि नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शाळांमधील पोषण आहाराची नियमित तपासणी व देखरेख अधिक कडक करण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.