-फडणवीसांसोबत डील झाल्याचा असा आरोप
Image Source:(Internet)
सोलापूर :
वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. महापालिका निवडणुका संपल्यानंतर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश करणार असून, यासाठी त्यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आधीच ‘डील’ झाल्याचा दावा सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
“आमच्या विरोधात भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूलाही भाजपच आहे. कारण प्रणिती शिंदे या प्रत्यक्षात भाजपसाठीच काम करतात, हे आता सर्वांना माहीत आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. भाजप आणि आरएसएस दोघेही निवडणुकीत उतरले असते, तरी त्यांना हरवले असते, असे विधान करत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.
ऑक्टोबरमध्ये प्रवेश ठरलेला होता?
सुजात आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीच प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या आणि ऑक्टोबर महिन्यात त्यासाठी तयारीही झाली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना “नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत, तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे उमेदवार निवडून आणा,” असे सांगितल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
निवडणुकांनंतर प्रवेश निश्चित-
महापालिका निवडणुका झाल्यानंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी त्यांची आणि फडणवीस यांची डील अंतिम असल्याचा दावा सुजात आंबेडकर यांनी पुन्हा केला. “भाजपला पराभूत करायचं असेल, तर वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय आहे,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
नाती, धंदे आणि सत्तेचे संबंध एकच-
सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील कथित जवळीकतेवरही टीका केली. “हे दोन्ही पक्ष ईव्हीएमवर आणि रस्त्यावर एकमेकांविरोधात लढायचं नाटक करतात. प्रत्यक्षात यांचे धंदे एक, लग्नसंबंध एक, नातेगोते एक आहेत. प्रणिती ताईंनी भाजपमध्ये प्रवेश केला, की पक्षही एकच होईल,” असा आरोप त्यांनी केला.
सोलापूरपुरती भूमिका स्पष्ट-
“मी संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेसबद्दल बोलत नाही, मात्र सोलापूरच्या काँग्रेस खासदार या भाजपसाठी काम करतात, हे आता उघड झाले आहे,” असे सांगत सुजात आंबेडकर यांनी सोलापूरमधील मतदारांना काँग्रेसपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
या आरोपांमुळे सोलापूरसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेसकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.